
हातखंबा येथे दोन दुचाकींना धडक देऊन एकाचा बळी घेणाऱ्या डंपर चालकावर गुन्हा
रत्नागिरी:- हातखंबा येथे शनिवारी सकाळी ९.३० च्या सुमारास एका भरधाव पिवळ्या रंगाच्या डंपरने दोन दुचाकींना धडक देऊन एका पादचाऱ्याचा बळी घेतला. डंपर चालक अपघातानंतर फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या अपघातात मंगेश मधुकर भस्मे (रा. पाली, ता. जि. रत्नागिरी) यांचा मृत्यू झाला.
या घटनेतील तक्रारदार दर्शन महेश बेग (वय २४, रा. हातखंबा) यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी ९.१५ च्या सुमारास ते आणि त्यांचा मित्र शुभम मारुती नागले मोटारसायकल (एम.एच.०८/ए.जे.४०९२) वरून एमआयडीसी रत्नागिरी येथे जाण्यासाठी निघाले होते. हातखंबा नागपूर पेठ येथे आले असता, मागून येणाऱ्या एका पिवळ्या रंगाच्या डंपरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेने दर्शन बेग आणि शुभम नागले दोघेही खाली पडले. अपघातानंतर दर्शन बेग तत्काळ उठले आणि मागून येणाऱ्या एका मोटारसायकलला थांबवून डंपरचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र, त्याच डंपरने पुढे असलेल्या दुचाकी अॅक्सेस (एम.एच.०८ ए.एल.०६७०) ला ठोकरून पळ काढला.
या अपघातात दर्शन बेग यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे, तर त्यांच्यासोबत असलेले शुभम नागले यांनाही किरकोळ दुखापत झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ज्या अॅक्सेस गाडीला डंपरने धडक दिली, त्यावरील चालक मंगेश मधुकर भस्मे (रा. पाली, ता. जि. रत्नागिरी) यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तात्काळ सिव्हिल हॉस्पिटल, रत्नागिरी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या प्रकरणी दर्शन महेश बेग यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
अज्ञात डंपर चालक आणि डंपरचा नंबर अद्याप समोर आलेला नाही. पोलीस डंपरचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. या अपघातामुळे रत्नागिरीतील रस्त्यांवरील वाढत्या अपघातांचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे. वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत आणि बेदरकारपणे वाहन चालवू नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.