
शनिवार ठरला घातवार; तीन अपघातात एक ठार, चार जखमी
रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा हायस्कूल समोरील वळण,निवळी आणि हातखंबा-झरेवाडी येथे तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू आणि चार जण जखमी झाले. अपघाताची ही घटना शनिवार 28 जून रोजी सकाळी 9.30 ते 10.15 वा.कालावधीत घडली आहे. त्यामुळे शनिवार हा घातवार ठरला आहे.
यात हातखंबा हायस्कुलसमोरील वळणात अज्ञात वाहनाच्या धडकेत मंगेश मधूकर भस्मे (42,रा.पाली-गराटेवाडी,रत्नागिरी) यांचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी सकाळी ते आपल्या ताब्यातील अॅक्सेस दुचाकी (एमएच-08-एएल-0670) वरुन पाली ते रत्नागिरी असे येत होते. ते हातखंबा हायस्कुलसमोरल वळणात आले असता समोरुन येणार्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकील समोरुन जोराची धडक दिल्यामुळे गंभिर जखमी झालेल्या मंगेश भस्मे यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची दुसरी घटना ही शनिवारी सकाळी 9.30 वा. सुमारास निवळी येथील वॉटर स्पोर्टच्या अलीकडील वळणात घडली. यातील फिर्यादी व जखमी रविंद्र गोविंद पाचकुडे (43,रा.करबुडे-पाचकुडेवाडी,रत्नागिरी) हे आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच-08-पी-4412) वर पाठीमागे पत्नी अस्मिता पाचकुडे हिला बसवून करबुडे ते रत्नागिरी असे येत होते. ते निवळी येथील वॉटर स्पोर्टच्या अलीकडील वळणात आले असता समोरुन येणारा ट्रेलर (केए-22-डी-5303) वरील चालकाने रस्त्याच्या उजव्या बाजुला येत त्यांच्या दुचाकीला धडक देत अपघात केला. यात पाचकुडे दांपत्य दुचाकीवरुन रस्त्यावर पडल्याने रविंद्र पाचकुडे यांच्या डोक्याला,हातांना गंभिर दुखापत झाली तर त्यांच्या पत्न्ाीला किरकोळ दुखापत झाली. अपघाताची तिसरी घटना शनिवारी सकाळी 10.50 वा.सुमारास हातखंबा-झरेवाडी येथे घडली. या अपघातातील दुचाकी चालक पियूष प्रेमकुमार भारती (19,रा.खेडशी-गयाळवाडी,रत्नागिरी) हा त्याच्या ताब्यातील युनिकॉर्न दुचाकी (एमएच-08-एवाय-0286) वर पाठीमागे त्याचा मित्र ॠषीकेश शिवराम बावधने (24,रा.पांगरी,रत्नागिरी) याला सोबत घेउन माचाळला फिरण्यासाठी जात होते. ते झरेवाडी स्टॉपजवळील वळणात आले असता पुढील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरुन येणारा ट्रक (जीजे-03-बीव्ही-0108) ला त्याने धडक देत अपघात केला. या अपघातात दोघेही गंभिर जखमी झाले आहेत.
दरम्यान, अपघाताच्या तिन्ही घटना ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्यामुळे ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती. पोलिसांनी तिन्ही ठिकाणच्या अपघातांचा पंचनामा करुन हातखंबा-हायस्कुल अपघातातील मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तसेच निवळी आणि झरेवाडी येथील एकूण चार जखमींना उपचारांसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले. सायंकाळी उशिरापर्यंत या अपघातांची नोंद ग्रामीण पोलिस ठाण्यात करण्याची कार्यवाही सुरु होती