
रत्नागिरीत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई : ब्राऊन शुगरसह एकजण अटकेत
रत्नागिरी, : रत्नागिरी जिल्ह्यात अमली पदार्थांचे रिंगण मोडून काढण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या विशेष मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कामगिरी केली आहे. ब्राऊन शुगरसारख्या घातक अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या एका इसमास अटक करून त्याच्याकडून सुमारे १ लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मा. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड यांनी जिल्ह्यात अमली पदार्थ प्रकरणांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला विशेष सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक २५ जून रोजी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत माळ नाका ते एस.टी. कॉलनी दरम्यान पेट्रोलिंग करत होते.
गस्तीदरम्यान पोलीस अभिलेखावरील एक गुन्हेगार मोटारसायकलवर संशयास्पद हालचाली करताना दिसून आला. पोलिसांना त्याच्यावर संशय आल्याने त्याची तपासणी करण्यासाठी पंचांना बोलावून त्याची झडती घेण्यात आली. त्यावेळी त्याच्या ताब्यातील पिशवीत ‘ब्राऊन शुगर टर्की’ या प्रकारातील सुमारे ८ ग्रॅम वजनाच्या एकूण ८८ पुड्या आढळून आल्या. या अमली पदार्थाची अंदाजित बाजार किंमत ४४,००० रुपये असून, आरोपीकडून इतर वस्तूंसह एकूण १,४४,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी अद्वैत संदेश चवंडे (वय २३ वर्षे, रा. साळवी स्टॉप, रत्नागिरी) या इसमाला अटक करण्यात आली आहे. आरोपीला रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात पुढील कारवाईसाठी हजर करण्यात आले असून, त्याच्यावर अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये (NDPS Act) गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ही यशस्वी कारवाई पो.उपनिरीक्षक शेषराव शिंदे, स.पो.फौ. सुभाष भागणे, पोहवा शांताराम झोरे, बाळू पालकर, अमित कदम, गणेश सावंत, प्रवीण खांबे व सत्यजीत दरेकर या पोलिस अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे पार पाडली. रत्नागिरी पोलिसांची ही तत्परता आणि दक्षता अमली पदार्थविरोधी मोहिमेत एक सकारात्मक पाऊल ठरत असून, जिल्ह्यातील नागरिकांकडून या कामगिरीचे कौतुक केले जात आहे.