खानूमध्ये पुन्हा बिबट्याचा हल्ला, कुत्रा ठार
रत्नागिरी:
खानू गावच्या हद्दीतील महामार्गालगत असलेल्या एका घरातील दोन कुत्र्यांवर बिबट्याने मध्यरात्री ३.३० वाजण्याच्या सुमारास हल्ला केला. एका कुत्र्याला ठार मारून दुसऱ्याला जखमी केले. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. गेल्या तीन महिन्यात तिसऱ्यांदा केलेल्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
मुंबई-गोवा महामार्गालगत खानू गावच्या हद्दीत सेवानिवृत्त शिक्षक संतोष आयरे यांचे घराच्या बाहेरच्या बाजूला दोन कुत्रे रात्री बसलेले होते. मध्यरात्री अचानक कुत्र्यांच्या भुंकण्याचा जोरजोरात आवाज येऊ लागल्याने तत्काळ आयरे यांनी घराबाहेर येऊन पाहिले असता एक कुत्रा जखमी अवस्थेत पडलेला होता. तर एका कुत्र्याला बिबट्या घेऊन जात असल्याचे दिसले. जखमी कुत्र्यावर तात्काळ उपचार करण्यात आले.
काही महिन्यांपूर्वी बिबट्याने मध्यरात्री कुत्र्यांवर हल्ला करून ठार मारले होते. त्यानंतर तो वारंवार येत असल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे. वनविभागाला कळविले असता त्यांनी आम्हालाच त्याच्या बंदोबस्तासाठी फटाके वाजवण्यास सांगितले मात्र कोणतीही उपाययोजना केली नाही असे आयरे यांनी सांगितले.