खेडमध्ये आठ फुटी मगरीला नैसर्गिक अधिवासात सोडले
खेड: शहरातील कन्याशाळा परिसरात पुराच्या पाण्यामुळे मानवी वस्तीत आलेली सुमारे आठ फूट लांबीची भलीमोठी मगर वनविभाग आणि छत्रपती वाईल्डलाईफ फाउंडेशनच्या पथकाने पकडली आहे. त्यानंतर मगरीला वैद्यकीय तपासणी करून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
खेड परिसरात गेले दोन दिवस मुसळधार पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहत होते. त्यामुळे नदीतील मगर पुराच्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर बाहेर पडून मानवी वस्तीकडे वळली. २० जूनला रात्री १२ वाजण्याच्या सुमारास ही मगर कन्याशाळेजवळ स्थानिक नागरिकांना दिसून आली. नागरिकांनी तत्काळ वनविभागाशी संपर्क साधला. वनविभागाचे मदत पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. छत्रपती वाईल्डलाईफ फाउंडेशनचे सदस्य सर्वेश पवार, श्वेत चोगले, रोहन खेडेकर, सूरज जाधव, सुमीत म्हाप्रळकर यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत वनपाल उदय भागवत, वनरक्षक परमेश्वर डोईफोडे, अशोक ढाकणे यांनी मगरीला पकडले. यामध्ये खेड नगरपालिका, अग्निशमन दल यांनीही सहकार्य केले. संपूर्ण मोहीम प्रादेशिक वनाधिकारी प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.