
चिपळूण-कराड’ अवजड वाहतुकीसाठी बंद
चिपळूण
चिपळूण-कराड महामार्गावरील पाटण तालुक्यातील पूल दुरुस्तीचे काम सध्या सुरू असल्याने हा मार्ग मोठ्या व अवजड वाहनांसाठी २२ जूनपर्यंत बंद ठेवण्यात आला असल्याने पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन येथील प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी केले आहे.
वाजेगांव पूल सोमवारी वाहून गेल्यानंतर या मार्गावरील अवजड वाहतूक बंद करण्यात आली. त्यानंतर बुधवारी सायंकाळी काही काळ वाहतूक पूर्ववत केली गेली. मात्र पुन्हा अडचणी निर्माण झाल्याने वाहतूक बंद करण्यात आली.
प्रांताधिकारी लिगाडे यांनी गुरुवारी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, सध्या या मार्गावरून लहान व हलक्या वाहनांना पर्यायी मार्गाने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र अवजड वाहने या मार्गावरून प्रवास करू शकणार नाहीत. परिणामी कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी देवरुख किंवा रत्नागिरी मार्गाचा वापर करावा, तर पुण्याकडे जाणाऱ्या मोठ्या वाहनांनी भोर किंवा इतर पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहनही लिगाडे यांनी केले आहे. दरम्यान, बुधवारी वाहतूक सुरू झाल्याचे कळल्यानंतर येथील मध्यवर्ती बसस्थानकातून दुपारी २ वाजताची मिरज फेरी सोडण्यात आली. सोमवारपासून गेल्या ४ दिवसात केवळ ही एकच फेरी या मार्गावर सुटली. वाहतूक बंद करण्यात आल्याने कोल्हापूर, अक्कलकोट बसेस या देवाख-आंबा घाटमार्गे, तर पुणे फेऱ्या ताम्हिणी घाटमार्गे सोडल्या जात आहेत. या मार्गावरील उर्वरित सर्व फेऱ्या २३ पर्यत रद्द करण्यात आल्याचे आगारप्रमुख दीपक चव्हाण यांनी सांगितले.