
फोटोग्राफर कांचन मालगुंडकर यांचा गुंजन इव्हेंटतर्फे गौरव पुरस्काराने सन्मान
रत्नागिरी – रत्नागिरीतील प्रसिद्ध फोटोग्राफर कांचन मालगुंडकर यांचा गुंजन इव्हेंटतर्फे गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. फोटोग्राफी क्षेत्रात त्यांनी केलेल्या कर्तृत्त्वाने व नवनिर्मितीने त्यांनी रत्नागिरीचे नाव उंचावले आहे. या कार्याची दखल घेऊन त्यांना ह्या पुरस्काराने स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात प्रसिद्ध ज्येष्ठ उद्योजक तथा मंत्री महोदय उदय सामंत व आमदार किरण सामान यांचे वडील अण्णा सामंत यांच्या हस्ते काल गौरविण्यात आले.
कांचन मालगुंडकर हे केवळ एक फोटोग्राफरच नाही, तर एक सर्जनशील दृष्टी, नवतंत्रज्ञाचे प्रणेते व सामाजिक कार्यात सक्रिय सहभागी व्यक्तीमत्त्व आहे. कांचन डिजिटलच्या माध्यमातून त्यांनी सिनेमॅटीक व्हिडिओ, ड्रोन शूटिंग व न्यू जनरेशन एडिटिंगच्या क्षेत्रात क्रांती घडवली आहे. याचबरोबर सामाजिक कार्यात झोकून देताना गेली 5 वर्षे घरगुती गणपती सजावट स्पर्धा, मॉडेलिंग आणि फॅशन शोचे यशस्वी आयोजन केले आहे. याचबरोबर जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त फोटो फेअर आणि कोव्हीड काळात लग्नसराई युट्युब चॅनलवर लाईव्ह करण्याचा राज्यभरात प्रथम सन्मान मिळवला होता. हे त्यांच्या नाविन्यपूर्ण दृष्टिकोनाचे द्योतक आहे.
रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर असोसिएशनचे सक्रिय सदस्य, युनिक फाउंडेशन व रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाचे उपाध्यक्ष ही पदे ते भुषवित आहेत. विशेष म्हणजे मंत्री उदय सामंत यांचे ते लाडके फोटोग्राफर आहेत. त्यांच्या या कार्याने सर्वांना प्रभावित केले आहे.
कांचन यांचा पुरस्काराने सन्मान करताना आयोजक गुंजन इव्हेंटचे ऍड. अमित नागवेकर, ऍड. सरताज कापडी, राज चव्हाण, अभिलाष पिळणकर, निखिल भुते, शुभम आयरे, दीपक डांगे आदी मान्यवर उपस्थित होते.