
वरंधा घाटात कार खड्ड्यात पलटी, 4 जण जखमी
खेड:
भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटात हिंडोशी येथील हरळा माळनजीक कार रस्त्यालगतच्या खड्ड्यात कोसळून प्रवासी किरकोळ जखमी झाले. अपघातात जीवितहानी टळली असली तरी कारचे मोठे नुकसान झाले. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला.
महाड येथून भोरच्या दिशेने कार (एम.एच.14/इ.वाय.4089) घाट चढत असताना चालकास रस्त्याचा अंदाज न आल्याने कारवरील नियंत्रण सुटून मोरीवरील खड्ड्यात कोसळली. कारमधील चार प्रवासी किरकोळ जखमी झाले. सर्व जखमींना मदतकर्त्यांनी उपचारासाठी नजीकच्या शासकीय रूग्णालयात दाखल केले. भोर-महाड मार्गावर रुंदीकरणाचे काम सुरू आहे. यासाठी रस्ता खोदण्यात आला आहे. यामुळे वाहतूक एकाच बाजूकडील मार्गावरून सुरू आहे. यामुळे अपघातांचा धोका कायम आहे.