
संगमेश्वर: सर्पदंशाने २७ वर्षीय मजुराचा मृत्यू
संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यात सर्पदंश झाल्याने एका २७ वर्षीय मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. भरत कांत (वय २७, रा. गदावली, राजस्थान, सध्या रा. सोनगिरी आंबेड, ता. संगमेश्वर) असे या मृत मजुराचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भरत कांत हा सोनगिरी आंबेड येथे रस्त्याच्या कामासाठी आला होता. दिनांक ८ जून २०२५ रोजी रात्री जेवण करून झोपले असताना मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास त्याला कोणत्यातरी सरपटणाऱ्या सापाने दंश केला. तात्काळ त्याला प्रथम उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, संगमेश्वर येथे नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर अधिक उपचारांसाठी त्याला वालावलकर रुग्णालय, डेरवण, ता. चिपळूण येथे दाखल करण्यात आले.
वालावलकर रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असतानाच, दिनांक १० जून २०२५ रोजी पहाटे ५ वाजून ३२ मिनिटांनी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.