
दापोलीत कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
इमारतीत टाकीमध्ये बालकाच्या बुडून मृत्यू प्रकरणात कारवाई
दापोली : उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे नव्याने बांधकाम चालू असलेल्या इमारतीत पाण्याने भरलेल्या टाकीमध्ये ९ वर्षांच्या समीर चव्हाण याचा बुडून मृत्यू झाल्याने संबंधित कंत्राटदार व त्याच्या सहकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीकांत काशिनाथ चव्हाण (वय ३२ वर्षे, व्यवसाय मजुरी, जेसीबी चालक रा. सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १२ जून २०२५ रोजी दुपारी १२.३० वा. ते १५.३० च्या दरम्यान उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे नव्याने बांधकाम चालू असलेल्या इमारतीच्या ठिकाणी समीर आणि त्याचा छोटा भाऊ खेळत असताना समीर हा येथे लिफ्टसाठी खोदलेल्या पाण्याने भरलेल्या टाकीमध्ये पडला. पाणी भरपूर असल्याने त्याचा पाण्यात बुडूनच मृत्यू झाला.
उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या सभोवताली सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व बाजूने कुंपण घालून बंदिस्त केलेल्या नव्हत्या. उघड्या स्थितीतील या टाक्या पावसाच्या पाण्याने भरून गेल्या होत्या. बांधकामाच्या ठिकाणी कंत्राटदार संदीप माधवराव पाटील (रा. विटा, जि. सांगली, साईट इंजिनियर) ताहिर हुसेन, तोफिक कोकणे व वॉचमन जग्गू हे उपस्थित नव्हते. त्यामुळे कामात निष्काळजीपणा दाखवल्यामुळे तिघेही मृत्यूस कारणीभूत असल्याने फिर्यादीच्या फिर्यादीवरून दापोली पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक राजकुमार यादव करत आहेत.