
संगमेश्वर बाजारपेठेत मुसळधार पावसामुळे चिखलाचे साम्राज्य
संगमेश्वर: काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे संगमेश्वर येथील भाजी मार्केट, मच्छी मार्केट आणि बस स्टँडच्या काही भागांमध्ये चिखलाचे मोठे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे व्यापारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या गैरसोयीला सामोरे जात आहेत. व्यापारी संघाचे उपाध्यक्ष गुरुप्रसाद भिंगार्डे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गाचे काम सध्या संगमेश्वर येथे मोठ्या प्रमाणात सुरू आहे. याच कामामुळे निर्माण झालेल्या समस्या आता समोर येत आहेत.
संगमेश्वर बाजारपेठेकडे जाण्यासाठी बनवण्यात आलेल्या सर्विस रोडला गटारांची कोणतीही सोय नाही. परिणामी, पावसाचे पाणी आणि डोंगर कापल्यामुळे आलेली माती थेट बाजारपेठेत शिरत आहे. भाजी मार्केट आणि मच्छी मार्केटसह काही भागांमध्ये गुडघ्यापर्यंत चिखल साचल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. रस्त्यावर चालण्यासाठी नागरिकांना पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने प्रचंड गैरसोय निर्माण झाली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास एका नागरिकाच्या घरात चिखल आणि पाणी शिरल्याने त्यांना रात्रभर जागून काढावी लागली, तसेच त्यांच्या घरातील जीवनावश्यक वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे अशी माहितीही भिंगार्डे यांनी दिली.
या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी ग्रामपंचायत तसेच प्रशासनाने तातडीने लक्ष घालून योग्य उपाययोजना करावी, अशी मागणी व्यापारी आणि नागरिकांकडून केली जात आहे.