
कोंड्येतील चोरीप्रकरणी अद्याप धागेदोरे नाहीत
राजापूर:
कोंड्येतील चोरीप्रकरणी राजापूर पोलिसांकडून कसून तपास सुरू असून अद्याप कोणतेच धागेदोरे पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. मात्र या प्रकरणी पोलिसांकडून वेगाने तपास सुरू असून लवकरच चोरट्यांना जेरबंद केले जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
कोंड्ये येथील शिक्षक कॉलनीसह बौद्धवाडी व मधलीवाडी येथील रहिवासी अशोक महाडेश्वर, अॅड. मुरलीधर मोरे, योगेश मोरे, शशिकांत लाड, अविनाश रामचंद्र तावडे अशी पाच बंद घरे फोडून चोरट्यानी एकूण ४ लाख ४३ हजाराचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या चोरीतील चोरटे हे सराईत चोरटे असावेत, असा पोलिसांचा अंदाज असून त्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या बाबत सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही दिवसात अशाप्रकारे बंद घरे फोडून झालेल्या चोऱ्यांबाबत माहिती घेताना त्यातील आरोपींची चोरीची पध्दत, त्यात काही साधर्म्य आहे काय, या बाबतही खात्री केली जात आहे. तर सर्व तांत्रिक बाजूंनीही तपास केला जात असून लवकरच चोरटे हाती लागतील, असा दावा पोलिसांनी केला आहे.