
मेंटल हॉस्पिटलमध्ये गतिमंद मुलाला जबर मारहाण
दोन ठिकाणी जबडा फाटला, पालकांकडून संताप
रत्नागिरी : रत्नागिरी मनोरुग्णालयात अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका गतिमंद मुलाला अमानुषपणे मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. केवळ मारहाण नाही तर चक्क तोंडाचा दोन ठिकाणी जबडा फाटेपर्यंत जबर मारहाण करण्यात आली आहे.
अमानुषपणे मारहाण करण्यात आल्याने मारहाण झालेल्या त्याची आई संतप्त झाली आहे. तिने रत्नागिरी शहर पोलिसांना निवेदन दिले आहे. या निवेदनात रुग्णालयातील वॉर्ड बॉय, नर्स या सर्वांवर त्यांनी आरोप केले आहेत. गंभीर जखमी मुलाला रत्नागिरी सिव्हील हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र येथील डॉक्टरांनी त्याला अधिक उपचारासाठी डेरवण येथील रुग्णालयात हलवले आहे. या प्रकारानंतर मुलाचे नातेवाईक संतप्त झाले आहेत. त्यांनी मनोरुग्णालयाबाबत संशय व्यक्त केला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात मारहाण झाली असून ती हाताने नसून इतर कोणत्यातरी वस्तूने झाली असावी असे नातेवाइकांचे म्हणणे आहे.
मारहाण झालेल्या रुग्णाची सिटीस्कॅन चाचणी केली असता जबड्याचे हाड 2 ठिकाणी तुटलेले दिसून येते आहे.या घटनेत संबंधित रुग्णाच्या जबड्याला दोन ठिकाणी फ्रॅक्चर झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक झाली असून, रुग्णाच्या आईने पोलिसांकडे सविस्तर चौकशीची मागणी केली आहे. त्यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, मन्नान मुनाफ फणसोपकर (२५), हा गतीमंद तरुण असून, २५ मे रोजी उपचारासाठी रत्नागिरीच्या मानसिक आरोग्य रुग्णालयात (मेंटल हॉस्पिटल) दाखल करण्यात आले होते. मात्र, दि. ६ जून रोजी सकाळी ११ वाजता मन्नान याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची माहिती त्यांना मिळाली.
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर मन्नानच्या जबड्याला दोन ठिकाणी फ्रॅक्चर झाल्याचे समजले. तेथील डॉक्टरांनी रुग्णाची स्थिती गंभीर असल्याने येथे उपचार शक्य नसल्याचे सांगितले व तत्काळ डेरवण येथील वालावलकर हॉस्पिटलमध्ये हलविण्याची आवश्यकता असल्याचे नमूद केले. विशेष म्हणजे, मेंटल हॉस्पिटल प्रशासनाकडून रुग्णाच्या नातेवाइकांना ना तर जखमी झाल्याची, ना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती.
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मन्नानला मेंटल हॉस्पिटलचे वॉर्ड बॉय व परिचारिका घेऊन गेले होते. डॉक्टरांनी रुग्णाच्या आई आणि मन्नान यांना अॅम्बुलन्समध्ये जबरदस्तीने बसवून डेरवण येथे पाठवले.
या घटनेमुळे रुग्णाच्या आई श्रीमती शरीफा मुनाफ फणसोपकर यांनी रत्नागिरी पोलीस निरीक्षकांना लेखी अर्जाद्वारे मागणी केली आहे की, मन्नानवर झालेल्या अमानुष मारहाणीची सखोल चौकशी करण्यात यावी व दोषींवर कठोर कारवाई व्हावी.