
कणकवलीतील चोरीप्रकरणी संगमेश्वरातील चोरट्यास अटक
कणकवली: कणकवली शहरातील कनकनगर येथील समृद्धी मिलिंद कोरगावकर यांच्या घरात झालेल्या चोरीचा छडा सिंधुदुर्ग एलसीबी आणि कणकवली पोलीस स्थानकाच्या पथकाने अवघ्या १६ तासांत लावला आहे. संतोष वसंत सुतार (वय ४८, रा. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) या चोरट्याला पणजी येथून साडेसहा तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र आणि अन्य ऐवजासह अटक करण्यात आली आहे.
कणकवली पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. पोलिसांनी पणजी येथे जाऊन चोरट्याला ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले, उपविभागीय पोलीस अधिकारी धनश्याम आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील आणि कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या सूचनेनुसार पार पडली. या पथकात कणकवली पोलीस ठाण्याचे पीएसआय अनिल हाडफ, एलसीबी पीएसआय रामचंद्र शेळके, एलसीबी पीएसआय समीर भोसले, हवालदार पांडुरंग पांढरे, हवालदार डॉमनिक डिसीडार, हवालदार जॅक्सन घींमालवीस आणि हवालदार आशिष जामदार यांचा समावेश होता.
शनिवार, ७ जून रोजी परिचारिका समृद्धी मिलिंद कोरगावकर या शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात नाईट ड्युटीसाठी गेल्या होत्या, तर त्यांचे पती मिलिंद आपल्या वडील आणि मुलासोबत मालवण येथील बहिणीकडे गेले होते. रविवार, ८ जून रोजी सकाळी पावणे नऊ वाजता ड्युटीवरून परत आल्यानंतर समृद्धी कोरगावकर यांना आपल्या बंद घराचे कुलूप तोडून चोरी झाल्याचे निदर्शनास आले. चोरट्याने त्या साडेतीन लाखांचा ऐवज चोरल्याची फिर्याद समृद्धी कोरगावकर यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दाखल केली होती.
चोरीनंतर आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. एलसीबी आणि कणकवली पोलिसांनी या सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत चोरट्याचा शोध सुरू केला. चोरट्याने कोरगावकर यांच्या घरातून एक मोबाईलही चोरला होता, ज्याचे लोकेशन पणजी येथे असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. त्यानुसार पोलिसांनी पणजी येथे जाऊन चोरट्याचा शोध घेतला. पणजी शहरात पायी गस्त घालत असताना संतोष वसंत सुतार हा पणजी येथील एका कॅसिनोच्या बाहेर दिसून आला. सीसीटीव्हीमुळे त्याचा चेहरा पोलिसांसमोर असल्याने त्याला ओळखणे सोपे झाले. पणजी येथे संशयास्पदरीत्या फिरत असलेल्या संतोष वसंत सुतार याला एलसीबी सिंधुदुर्ग आणि कणकवली पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यावेळी त्याच्याकडे चोरीचा मुद्देमाल सापडला.