रत्नागिरीत कौटुंबिक वादातून मारहाण, दोघांविरोधात गुन्हा दाखल
रत्नागिरी: रत्नागिरी तालुक्यातील पाली येथील मावळणकरवाडी, खानू येथे कौटुंबिक वादातून एका ५७ वर्षीय महिलेला मारहाण केल्याची घटना, ६ जून रोजी संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या विविध कलमांन्वये दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुनंदा सुरेश मावळणकर (वय ५७, रा. मावळणकरवाडी, खानू, पाली) या त्यांच्या राहत्या घरी असताना संत निरंकारी महात्मा यांच्या सत्संगाला जाणारे श्रीराम सदाशिव ठिक हे त्यांच्या घरी आले होते. त्यावेळी सुनंदा मावळणकर त्यांच्या दिर प्रकाश मावळणकर यांनी घरातील सामायिक देव घरात नेल्याबद्दल काय करावे, याबाबत बोलत होत्या. त्यांचे बोलणे आरोपी प्रवीण प्रकाश मावळणकर आणि प्रसाद प्रकाश मावळणकर या दोघांनी ऐकले. या कारणावरून मनात राग धरून आरोपी प्रवीण व प्रसाद हे सुनंदा मावळणकर यांच्या घरात घुसले.
यावेळी प्रसाद मावळणकर याने हातात प्लॅस्टिकचा पाईप घेऊन सुनंदा मावळणकर यांच्या डाव्या हातावर मारून दुखापत केली. तसेच, त्याने त्यांच्या गालावर आणि मानेवर हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. शिवीगाळ करत “तुला ठार मारून टाकीन,” अशी धमकीही त्याने दिली. भांडणे सुरू असताना सन लावण्या मावळणकर ही धावत तिथे आली आणि भांडणे सोडवण्याचा प्रयत्न करू लागली. त्यावेळी प्रसादने सून लावण्या मावळणकर हिच्या मानेवरही हाताने मारले.
घरात आरडाओरडा सुरू झाल्याने दिर प्रकाश मावळणकर आणि त्यांची पत्नी प्रतिभा प्रकाश मावळणकर, तसेच प्रवीण मावळणकर यांची पत्नी सरेखा मावळणकर हे भांडणे सोडवण्यासाठी तिथे आले होते. नंतर तेथून निघून गेले. या घटनेनंतर सुनंदा सुरेश मावळणकर यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी गु.आर.नं. ११२/२०२५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास रत्नागिरी ग्रामीण पोलिस करत आहेत.