
रत्नागिरीत गोमांस प्रकरणी नेपाळीसह तिघांविरोधात गुन्हा
रत्नागिरी : शहरातील एकता मार्गावरील यशोदा अपार्टमेंट येथे गोमांसाचा साठा आढळून आल्याने खळबळ उडाली. या प्रकरणी एका महिला आरोपीसह तिघांविरोधात धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आणि महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यांतर्गत रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे ३ ते ४ किलो वजनाचा गोमांसाचा पाय जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी ३ जून रोजी सायंकाळी ६ ते ९ वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. गोरक्षा व गोसेवा संघाच्या व्हॉट्सॲप ग्रुपवरून फिर्यादी सुशील सुभाष कदम यांना संसारे गार्डन, एकता मार्गावरील यशोदा अपार्टमेंट येथे गोमांसाचा पाय सापडल्याची माहिती मिळाली. त्यावेळी घटनास्थळी पोलीस पंचनामा करत असल्याचीही माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर फिर्यादी कदम यांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. यशोदा अपार्टमेंटमधील वॉचमनच्या रूममध्ये प्लास्टिकच्या टपामध्ये पोलिसांच्या उपस्थितीत त्यांना गोमांसाच्या मागच्या बाजूचा सुमारे ३ ते ४ किलो वजनाचा पाय दिसला. या प्रकरणी चौकशी केली असता, आरोपी महिलेने सदर मांस तिचा नवरा आरोपी रणजित दमाई याने आरोपी नासिर मुल्ला (पूर्ण नाव व पत्ता अज्ञात) याच्याकडून आणल्याचे सांगितले.
या आरोपींनी गोहत्या, गो तस्करी आणि गोमांसाचा पुरवठा केल्याने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या असून, पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने संगनमताने सदर प्राण्याचे अवयव नष्ट केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
रत्नागिरी शहर पोलिसांनी या प्रकरणी तात्काळ कारवाई करत भारतीय दंड संहिता कायदा कलम २९९, ३२५, २३८, ३(५) आणि महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा कलम ५(अ)(ब)(क), ९(अ), १० प्रमाणे गुन्हा.आर.नं. १३०/२०२५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस करत आहेत.