
मंडणगडमध्ये वादातून तिघांना कांबेरुने मारहाण
महिलेसह दोन पुरुषांवर गुन्हा दाखल
मंडणगड : तालुक्यातील पालघर गावठाण येथे झाडाच्या पाल्यावरून झालेल्या वादातून एका कुटुंबातील तिघांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. यात फिर्यादीसह त्यांची आई आणि लहान बहिणीला कांबेरु व रॉडने मारहाण करण्यात आली असून, वडिलांनाही शिवीगाळ व मारहाण झाल्याचे समोर आले आहे. ही घटना २ जून रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी एका महिलेसह दोन पुरुषावर मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नरेश चंद्रकांत तापकिरे, शैलेश चंद्रकांत तापकिरे आणि एक अनोळखी महिला (सर्व रा. पालघर गावठाण, ता. मंडणगड) अशी संशयितांची नावे आहेत.
याप्रकरणी ऋणाली रवींद्र सागवेकर (२०, रा. पालघर गावठाण, ता. मंडणगड) यांनी मंडणगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, वडिलांनी एक काटेरी झाड तोडले होते. त्या झाडाचा पाला आरोपींच्या जागेत पडल्याने वादाला सुरुवात झाली. याच कारणावरून नरेश तापकिरे, शैलेश तापकिरे आणि एक अनोळखी महिलेने फिर्यादी ऋणाली सागवेकर, त्यांची आई रवीना सागवेकर आणि त्यांची लहान बहीण ऋतिका सागवेकर यांना कांबेरुने आणि रॉडने मारहाण करण्यास सुरुवात केली. यामध्ये ऋणाली यांच्या आईला व वडिलांना मारहाण करत शिवीगाळही करण्यात आली. या घटनेत ऋणाली रवींद्र सागवेकर या जखमी झाल्या आहेत.
मंडणगड पोलिसांनी नरेश चंद्रकांत तापकिरे, शैलेश चंद्रकांत तापकिरे आणि एक अनोळखी महिला या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.