
राजापुरात वृध्द महिलेला दगडाने मारहाण
राजापूर : तालुक्यातील ओझर-साबळेवाडी येथे क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादानंतर एका वृध्द महिलेला दगडाने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात दुसऱ्या एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी द्रौपदी पांडुरंग साबळे (वय ७७, रा. भांडुप, सध्या रा. ओझर-साबळेवाडी, ता. राजापूर) यांचा मुलगा जितेंद्र याने आरोपी महिलेला “आमच्या घरासमोर गावकर शाम साबळे यांना ६ हजार रुपये दिले का नाहीस?” अशी विचारणा केली. याच कारणावरून संशयित आरोपी महिलेने जितेंद्रसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. वादाचे पर्यावसान शिवीगाळीत झाले आणि संशयित महिलेने जितेंद्रच्या अंगावर धावून जात त्याच्या कानशिलात मारून त्याला ढकलाढकली केली.
जितेंद्रला सोडवण्यासाठी त्याची आई, फिर्यादी द्रौपदी साबळे पुढे सरसावल्या असता, आरोपी महिलेने अंगणात पडलेला दगड उचलून द्रौपदी साबळे यांच्या डोक्यात घातला. यामध्ये द्रौपदी साबळे यांना दुखापत झाली.
या घटनेनंतर द्रौपदी साबळे यांनी राजापूर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ दखल घेत, ३ जून २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता आरोपी महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास राजापूर पोलीस करत आहेत.