
सुकिवलीतील गांजा खरेदीचे ‘मुंबई कनेक्शन’
अटकेतील संशयित पोलीस कोठडीत; रॅकेट असल्याचा संशय, तपासाला गती
खेड
तालुक्यातील सुकिवली-चोरद नदीपुलानजीक पोलिसांनी वेषांतर करत गांजाची वाहतूक केल्याप्रकरणी अटक केलेल्या शंकर विनोद पारदे (२९, सध्या रा. सुकिवली-बौद्धवाडी, मूळगाव-तुळजापूर, धाराशिव) याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता दोन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली. गांजा खरेदीचे “मुंबई कनेक्शन’ असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या प्रकरणात रॅकेट असल्याचा पोलिसांना दाट संशय असून तपास गतीमान करण्यात आला आहे.
पोलीस पथकाने १६२ ग्रॅम वजनाचा व १६ हजार ६९५ किंमतीचा गांजा आणि गांजाच्या वाहतुकीसाठी वापरलेली (एमएच १२ एक्सजी ५५८७) दुचाकी असा १ लाख ६० हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला होता. हा गांजा नेमका आणला कुठून, याचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू असताना ‘मुंबई कनेक्शन’ असल्याचे निष्पन्न झाले आहे.
शंकर विनोद पारदे हा गांजाची विक्री कोणाला करणार होता, याचाही तपास केला जात आहे. गांजा खरेदी-विक्री प्रकरणाचे रॅकेट उघडकीस आणण्यासाठी येथील पोलिसांनी कंबर कसली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण येवले करत आहेत.