
चोरद नदी पुलावर गांजासह तरुणाला अटक
सोळा हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त
खेड: तालुक्यातील चोरद नदी येथे गांजा विक्रीसाठी येणाऱ्या तरुणाला खेड पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून १ किलो १६२ ग्रॅम असा सुमारे साडे सोळा हजार रुपये किमतीचा सुकलेला गांजा जप्त केला. गांजा विक्रीसाठी वापरलेली दुचाकीही जप्त केली. ही कारवाई काल (ता. ३१) रात्री ८ च्या सुमारास केली. शंकर विनोद पारदे असे संशयिताचे नाव आहे.
काल सुकिवली चोरदा नदीच्या पुलावर रात्री ८ च्या सुमारास एक व्यक्ती काळ्या रंगाच्या गाडीतून गांजा विक्रीसाठी येणार आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याप्रमाणे पथकाने सायंकाळी ७ वाजल्यापासून चोरदा नदीच्या पुलावर वेशांतर करून पाळत ठेवली होती. रात्री ८ च्या सुमारास एक व्यक्ती काळ्या रंगाच्या गाडीतून पुलावर आली. माहितीची खातरजमा करून पोलिसांच्या पथकाने त्या व्यक्तीला ताब्यात घेतले.
त्याच्याकडील दुचाकीची झडती घेतली असता त्यात गांजाच्या पिशव्या आढळल्या. त्या व्यक्तीचे नाव व गाव विचारले असता त्याने शंकर विनोद पारदे असे सांगितले. तो सध्या खेड येथ सुकिवली बौद्धवाडीत राहत असून, त्याचे मूळ गाव तुळजापूर बाजारपेठ (ता. तुळजापूर, जि. धाराशिव) असे असल्याचे त्याने सांगितले. त्या व्यक्तीकडे १६ हजार ६९५ रुपये किमतीचा एका पिवळ्या रंगाच्या प्लास्टिक पिशवीत असलेला हिरवट पाने, फुले, काड्या व बिया असलेला उग्र वास असलेल्या १ किलो १६२ ग्रॅम वजनाचा सुकलेला गांजा सापडला. तसेच त्याच्याजवळील ९० हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची दुचाकी जप्त करण्यात आली आहे. त्याच्याकडून एकूण १ लाख ६ हजार ७९५ रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी शंकर विनोद पारदे याच्याविरोधात खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक केली आहे. खेड पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक नितीन पांडुरंग भोयर यांच्या नेतृत्वाखाली सहा. पोलिस निरीक्षक जयंत गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक रोहिदास केंद्रे, पोलिस उपनिरीक्षक श्रीकृष्ण येवले, पोलिस कॉन्स्टेबल रूपेश जोगी, रोहित जोयशी, अजय कडू, राम नागुलवार, वैभव ओहोळ यांच्या पथकाने केली.