
रत्नागिरीत १ जूनपासून मोफत रूग्णालय सुरू होणार
रत्नागिरी
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र रत्नागिरीमध्ये भगवान महादेव सांबरे मोफत रूग्णालय सुरू करत असून या रूग्णालयाचा लोकार्पण सोहळा दि.१ जून रोजी होणार आहे.गोरगरीब रूग्णांना मोफत आरोग्य सेवा मिळावी याउद्देशाने आम्ही मोफत रूग्णालय सुरू करत असल्याची माहिती जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक नीलेश सांबरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
या मोफत रूग्णालयात शस्त्रक्रिया,ह्रदयरोग,कॅन्सर विभाग,प्रयोगशाळा,बालरोग विभाग,युरॉलॉजी विभाग,नेत्ररोग सुरू करण्यात येणार आहेत. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्यावतीने महाराष्ट्रात सुरू केलेले तिसरे मोफत रूग्णालय आहे.गतवर्षी स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमात आम्ही रत्नागिरीत मोफत रूग्णालय सुरू करण्याची घोषणा केली होती ती आता आम्ही पूर्ण करत आहोत असे सांबरे म्हणाले.
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेने कोकणात पाचशेहून अधिक आरोग्य शिबिरे घेतली आहेत.तीनशेहून अधिक नेत्रतपासणी शिबिर घेतली आहेत.कोकणातील पाच जिल्ह्यात संस्थेच्या ४० रूग्णवाहिका २४ तास सेवा देत असल्याचे नीलेश सांबरे यांनी सांगितले.यावेळी ॲड.महेंद्र मांडवकर उपस्थित होते.
स्पर्धा परीक्षा वर्ग चालवणार
रत्नागिरीतील मुले एमपीएससी आणि युपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होऊन प्रशासकीय अधिकारी बनावेत यासाठी जिल्ह्यातील एक हजार विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेचे मोफत मार्गदर्शन वर्ग चालवणार असल्याचे नीलेश सांबरे यांनी सांगितले.