
चिपळूणात ३९ शाळांच्या इमारती धोकादायक
२५ शाळेच्या इमारतीच्या दुरुस्तीला परवानगी
चिपळूण: जिल्हा परिषदेच्या चिपळूण तालुक्यातील ३९ प्राथमिक शाळांच्या इमारती धोकादायक बनल्या आहेत. यातील २५ शाळेच्या इमारतीच्या दुरुस्तीला परवानगी मिळाली आहे.
चिपळूणच्या शहर आणि ग्रामीण भागातील अनेक शाळा नादुरुस्त झाल्या आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांच्या जिवावर बेतण्याचा धोका निर्माण झाला आहे. यातील २५ धोकादायक बनलेल्या शाळांच्या दुरुस्तीला मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांमध्ये गरीब तसेच सर्वसामान्यांची मुले शिक्षण घेतात. शाळांची गुणवत्ता सुधारावी यासाठी शिक्षण विभागातर्फे विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्याचा चांगला परिणामही अलीकडच्या काळात दिसत आहे. ज्या शाळेत ग्रामीण भागातील मुले शिक्षण घेत आहेत त्या जिल्हा परिषदेच्या सुमारे ३९ शाळा धोकादायक बनल्या आहेत. गोवळकोट शाळा, गोंधळे, चिवेली शाळांच्या इमारती धोकादायक झाले आहेत. काही गावातील शाळांच्या इमारती विद्यार्थ्यांसाठी अतिशय धोकादायक आहेत, त्यामुळे खासगी जागेत शाळा भरवली जाते. काही ठिकाणी इमारतीच्या छतावर प्लास्टिक टाकून गळती काढण्यात आली आहे. ज्या शाळांच्या इमारती नादुरुस्त झाल्या आहेत त्या शाळांमधून शिक्षण घेणे विद्यार्थ्यांच्या जिवावर बेतणारे आहे.