शिवसेना मिरजोळे जिल्हापरिषद गटातर्फे उत्पन्न दाखला शिबीर संपन्न
रत्नागिरी: उद्योगमंत्री तथा पालकमंत्री माननीय ना. उदयजी सामंत यांच्या आदेशानुसार मिरजोळे जिल्हापरिषद गटातील मजगांव ग्रामपंचायत येथे उत्पन्न दाखला मिळवण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रत्नागिरी सेतू कार्यालयात होणारी प्रचंड गर्दी आणि नागरिकांना होणारा आर्थिक खर्च लक्षात घेऊन, प्रत्येक पंचायत समिती गणात एका गावात असे शिबीर घेण्याचे निर्देश देण्यात आले होते.
या निर्देशानुसार मजगांव ग्रामपंचायत येथे उत्पन्न दाखला कॅम्प आयोजित करण्यात आला. या शिबिराचा फणसवळे, मजगांव, केळये, म्हमूरवाडी आणि दांडे अडोम या गावांतील एकूण ६३ ग्रामस्थांनी लाभ घेतला. माननीय ना. उदयजी सामंत यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार, हे उत्पन्न दाखले संबंधित अर्जदारांना मोफत वाटप करण्यात येणार आहेत.

या शिबिराला केळये येथील तलाठी राजश्री ऐवळे, तसेच कुवारबांव येथील तलाठी वैभव शेंडगे उपस्थित होते. याशिवाय, शिवसेना विभाग प्रमुख प्रवीण पवार, शिवसेना विभाग संघटक तथा मजगांवचे सरपंच फैयाज मुकादम, उपविभाग प्रमुख सुमेश आंबेकर, युवासेना उपतालुका अधिकारी संदीप नाखरेकर, मजगांवचे उपसरपंच बाबू इबजी, मुज्जू मुकादम, हुसैन टेमकर, सायली नाखरेकर, फाईजा मुकादम, रिनम कांबळे, प्रणय धुळप, सेजल कदम, तहसीन मुकादम आदी ग्रामस्थ आणि शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.
या कॅम्पचे आयोजन केल्याबद्दल ग्रामस्थांनी ना. उदयजी सामंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले आहेत.
