
आरवली येथे किराणा दुकान फोडून पावणे दोन लाखांची चोरी; २४ तासांत चोरट्याला अटक
संगमेश्वर: आरवली येथील एका किराणा मालाच्या दुकानातून १ लाख ८६ हजार रुपयांची रोकड चोरल्याप्रकरणी संगमेश्वर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत एका चोरट्याला जेरबंद केले आहे. पोलिसांनी चोरलेला ऐवजही हस्तगत केला आहे.
याबाबत श्रीकृष्ण उद्धव पाटणकर यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पाटणकर २२ मे रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे आपले दुकान बंद करत होते. त्यावेळी गल्ल्यातील १ लाख ८६ हजार रुपये भरलेली हॅन्डबॅग त्यांनी काउंटरवर ठेवली आणि शटर ओढण्यासाठी खाली गेले. याच संधीचा फायदा घेत, तिथे आलेल्या एका अनोळखी इसमाने ती बॅग घेऊन पळ काढला.
या घटनेची माहिती मिळताच, संगमेश्वर पोलीस उपनिरीक्षक शंकर नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. तपास पथकातील सचिन कामेरकर आणि इतरांनी जलदगतीने कारवाई करत विष्णू शांताराम गुरव आणि आशिष जाधव (दोघे रा. खेरशेत) या दोघांना या चोरीप्रकरणी २४ तासांच्या आत अटक केली. पोलिसांनी चोरीला गेलेली संपूर्ण रक्कम हस्तगत केली आहे.