दत्तनगर परिसरात तीन घरांमध्ये शिरले गटाराचे पाणी
देवरूख:
देवरूख परिसरात मंगळवारी दुपारनंतर मुसळधार पाऊस पडला. या पावसाने शहरातील दत्तनगर परिसरातील द्रौपदी इन हॉटेलच्या बाजूला असलेल्या तीन घरांमध्ये गटाराचे पाणी घुसून नुकसान झाले आहे. विहिरीतही गटाराचे पाणी गेल्याने येथील तीन कुटुंबांवर बिकट परिस्थिती ओढवली आहे.
मुसळधार पावसाने देवरूख येथील शाळा क्रमांक ३, देवरूख न्यायालय या सर्व परिसरातील पाणी येथील घरांमध्ये घुसले. या परिसरातील गटारांच्या सांडपाण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. या समस्येबाबत येथील नागरिक रवींद्र कळंबटे, हरिश्चंद्र कळंबटे, कृष्णा खापरे यांनी नगरपंचायतीला निवेदन दिले आहे. या परिसराची पाहणी करून ही समस्या मार्गी लावावी, अशी विनंती या निवेदनातून केली आहे.