
साटवली येथे उपकेंद्रामध्ये वीज कोसळल्याने वीजपुरवठा खंडित
लांजा:- प्रचंड कडकडाट करत वीज साटवली येथील वीज उपकेंद्रामध्ये कोसळल्याची घटना मंगळवारी २० मे रोजी सायंकाळी पाचच्या सुमाराला घडली होती .यामध्ये महावितरणचे देखील नुकसान झाले असून काही गावांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. महावितरणच्या अधिकारी, कर्मचार्यांकडून बुधवारी सायंकाळी उशीरापर्यंत वीज पुरवठा सुरळीत व दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू होते.
मंगळवारी प्रचंड कडकडाटासह संपूर्ण लांजा तालुक्याला पावसाने झोडपून काढले होते. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास प्रचंड कडकडाट करत वीज ही साटवली येथील वीज उपकेंद्रामध्ये पडली होती. त्यामुळे उपकेंद्रामधील उपकरणांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे उपकेंद्र सध्या बंद आहे. या उपकेंद्राद्वारे होणारा वीजपुरवठा लांजा ,चांदोर व धारतले या उपकेंद्रामधून पर्यायी मार्गाने चालू करण्यात आला आहे. मात्र सध्या मोठ्या प्रमाणात चालू असलेल्या पावसामुळे व विजांच्या कडकडाटामुळे त्यात अडथळा येण्याची शक्यता महावितरणने वर्तवली आहे. यामध्ये सापुचेतळे, आगवे, खानवली, साटवली, बेनी बु. ,खावडी या गावांचा व परिसराचा वीजपुरवठा हा वारंवार खंडित स्वरूपाचा आहे.