
लांजा तालुक्यातील वेसुर्ले येथे मृतावस्थेत आढळला गवा
लांजा: लांजा तालुक्यातील वेसुर्ले गावातील जंगलमय परिसरात, एका ओढ्याच्या ठिकाणी चार ते पाच वर्षांचा एक गवा मृतावस्थेत आढळून आला आहे. ही घटना मंगळवार, २० मे रोजी उघडकीस आली.
याबाबत लांजा वनविभागाचे वनपाल सारिक फकीर यांनी माहिती दिली की, वेसुर्ले गावाच्या डोंगराळ आणि जंगलमय भागातील ओढ्यात हा मृतावस्थेतील गवा आढळला. प्राथमिक अंदाजानुसार, गव्याचे वय सुमारे चार ते पाच वर्षे असावे. उंचावरून खाली पडल्यामुळे आणि त्याच्या शरीराच्या अंतर्गत भागाला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे.
ज्या ठिकाणी गवा आढळून आला, तो परिसर दुर्गम आणि डोंगराळ असल्याने तिथे वाहन पोहोचू शकत नव्हते. त्यातच मंगळवारी जोरदार पाऊस सुरू असल्याने गव्याला बाहेर काढण्यात वनविभागाला अनेक अडचणी आल्या. त्यामुळे, ज्या ठिकाणी गवा मृतावस्थेत आढळला, त्याच ठिकाणी त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. मंगळवारी सायंकाळ झाल्याने, आज, बुधवारी त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जातील, अशी माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे.
—