चिपळुणात घरावर कोसळली वीज
चिपळूण: चिपळूण शहर व परिसरात काल सोमवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या दरम्यान शहरातील शंकरवाडी मार्गावरील एका घरावर विज कोसळली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र मुनावर आयुब नाईक व अलताफ आयुब नाईक यांच्या घराचे सुमारे दीड लाखाहून अधिक नुकसान झाले आहे.
दिर्घकाळानंतर चिपळूणात सोमवारी सायंकाळ नंतर अवकाळी पावसाने झोडपले. रात्री पावणेदहाच्या सुमारास वादळी वारा आणि पाऊस सुरू असतानाच विजांच्या कडकडाटात शंकरवाडी येथील घरावर विज पडली. मुनावर नाईक व आयुब नाईक यांचे कुटुंबीय एका कार्यक्रमास निघण्यासाठी घराबाहेर पडत होते. त्याच दरम्यान त्यांच्या घरावर विज पडली. सुदैवाने यात कोणतिही जिवीतहानी झालेली नाही. दैव बलवत्तर म्हणून हे कुटुंब वाचले. या घटनेतील घरातील सर्व विद्युत उपकरणे जळून खाक झाली आहे. तर घरावरील पाण्याच्या साठवण टाकीवर विज पडल्याने ती फुटली आहे. घरावरील कवले फुटली असून बोअरवेल, सिसिटिव्ही यंत्रणा, इनर्व्हरटर, वायफाय, आदी सर्व विद्युत यंत्रणा खराब झाल्या आहेत. महसूलच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. विज पडल्यानंतर मोठा स्फोट झाल्यासारखा आवाज आला. थोडावेळ नेमके काय झालेय हे कोणालाच कळले नाही. काही दगड शेजारच्या घरांवर पडले होते. या घटनेनंतर रात्री येथे लोकांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेत नाईक कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे.