जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले
रत्नागिरी : जिल्ह्यात आज मंगळवारी सायंकाळी जोरदार अवकाळी पाऊस पडला. खेड, चिपळूण,संगमेश्वर तालुक्याला अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. दुपारनंतर अचानक आलेल्या अवकाळीने नागरिकांची चांगलीच दाणादाण उडवली. वादळी वारा व ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाचे संगमेश्वर, खेड, चिपळूण तालुक्यात जोरदार आगमन झाले. या पावसामुळे देवरूख, संगमेश्वर, साखरपा, आरवली, सावर्डे, चिपळूण,खेर्डी, अलोरे, लावेल, लोटे, असगणी बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची तर त्रेधातिरपीट उडाली. व्यापाऱ्यांचीही पावसामुळे धावपळ उडाली.
मान्सून महाराष्ट्राच्या दिशेने आगेकूच करत आहे. त्यामुळे राज्यात सगळीकडेच अवकाळी पाऊस बरसणार असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. गेले काही दिवस जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे अवकाळी पाऊस कधीही बरसू शकतो. अशी स्थिती होती. ढगाळ वातावरणाबरोबरच ऊनही पडत होते. त्यामुळे गरमीने नागरिक हैराण झाले होते. त्यातच आज मंगळवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. काळ्या ढगांनी आकाशात दाटी केली होती.
त्यामुळे पाऊस केव्हाही कोसळू शकतो असे वातावरण तयार झाले होते. जाणकारांनीही पाऊस बरसू शकतो. अशी शक्यता वर्तवली होती. अखेर आज मंगळवारी दुपारी २ नंतर अवकाळी पावसाने ढगांच्या गडगडाटासह जोरदार आगमन केले. वादळी वाऱ्यासह अचानक बरसलेल्या अवकाळी पावसाने सर्वांचीच त्रेधातिरपीट उडवली. सध्या मे महिना सुट्टीचा महिना असल्याने बरेच

चाकरमानी आपल्या गावी आले आहेत. खरेदीसाठी चाकरमान्यांची बाजारपेठांमध्ये गर्दी होत आहे. अशातच पावसाने आज मंगळवारी दुपारी जोरदार आगमन केल्याने अनेकांची धावपळ उडाली. दुचाकी वाहनचालकही अचानक आलेल्या पावसामुळे पुरते भिजून गेले. तर नागरिकांची उन्हाळ्यात बाहेर ठेवलेली लाकडे भिजून गेली. ही लाकडे प्लँस्टीकच्या कागदाने झाकून ठेवण्यासाठी नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. एकंदरीत अचानक बरसलेल्या पावसाने सर्व जिल्ह्यात
चांगलीच दाणादाण उडवली.
