
गोव्यात प्रेयसीवर हल्ला करुन गुहागरला आलेल्या संशयितास अटक
गुहागर: प्रेयसी साक्षी हिच्यावर खूनी हल्ला केल्यानंतर गोव्यातून गुहागर येथे पळून आलेला संशयित अजय कदमला सांगली येथे एका लॉजवर असताना गुरुवारी केपे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. या संशयिताला केपे न्यायालयासमोर हजर केले असता, सहा दिवसांच्या पोलीस कोठडीचा रिमांड देण्यात आला आहे. या घटनेमुळे राज्यात खळबळ निर्माण झाली होती.
प्रेयसी आपली प्रतारणा करते आणि ती दुसऱ्याबराेबर संबंध ठेवून आहे, या शंकेने संशयिताला ग्रासले होते. त्यातूनच त्याने हा हल्ला केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. पोलिसांकडून दिलेल्या माहितीप्रमाणे, चार वर्षे संशयित आणि साक्षी यांच्यात संबंध होते.. १२ मे रोजी साक्षीवर शिरवई येथे हल्ला केला आणि इस्पितळात दाखल करुन पळही काढला होता.
अजय याने बसने प्रवास करीत आधी रत्नागिरीतील गुहागर गाठले. तिथे त्याचे नातेवाईक राहत असल्याने जेवण करुन तो तिथून बाहेर पडला. त्यानंतर त्याने सांगली गाठली. अजय हा रत्नागिरीच्या बाजूने निघाला असल्याची माहिती मिळाल्यावर केपेचे पोलीस उपनिरीक्षक दिगंबर बोंद्रे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस शिपाई प्रणय नाईक, सूरज नाईक व देविदास वरक यांचे पथक महाराष्ट्रात पाठविण्यात आले. या पथकाला संशयिताचे ‘लोकेशन’ सांगली येथे सापडल्यानंतर त्याला तेथून ताब्यात घेण्यात आले.