
दापोली-कळकी मार्गावर दोन बसची समोरासमोर धडक; चालक जखमी
दापोली : दापोली-कळकी मार्गावर दोन एसटी बसची समोरासमोर धडक झाली. या अपघातात एका बसचा चालक जखमी झाला असून दोन्ही बसचे मिळून सुमारे पाच हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी दुसऱ्या बसचा चालक मारुती अंगदराव कराड (रा. रुपनगर दापोली) याच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २८१, १२५ आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भास्कर शामराव दर्शने (वय ३४, रा. काळकाईकोंड, ता. दापोली) हे त्यांच्या ताब्यातील एसटी बस ( एमएच १४ बीटी २५८९) मधून दापोलीहून कळकीकडे प्रवासी घेऊन जात होते. उंभरघरहून दापोलीकडे येणारी एसटी बस ( एमएच १३ सीयू ६८३७) अतिवेगात आली आणि फिर्यादी यांच्या बसला धडकली.
या धडकेत फिर्यादी भास्कर दर्शने यांना मुका मार लागला आहे. तसेच, त्यांच्या ताब्यातील एसटी बस ( एमएच १४ बीटी २५८९) चे सुमारे पाच हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
या घटनेची तक्रार १५ एप्रिल रोजी दुपारी १३.४३ वाजता दापोली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.