
नाटे येथे भाऊ, पुतण्याच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू
राजापूर: दारूच्या नशेत असताना किरकोळ कारणातून झालेल्या वादातून एका 45 वर्षीय इसमाला जीवे ठार मारल्याची घटना शुक्रवारी नाटे, ठाकरेवाडी येथे दुपारच्या सुमारास घडली. स्वप्नील ठाकरे (45, रा.नाटे ठाकरेवाडी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. भाऊ आणि पुतण्याने हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली असून या प्रकरणी संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. नाटे परिसरात घडलेल्या या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाटे, ठाकरेवाडी येथील स्वप्नील ठाकरे हे रत्नागिरी येथे वास्तव्याला असून गुरूवार 15 मे रोजी ते आपल्या लहान मुलासह नाटे गावी आले होते. गुरूवारी रात्री त्यांनी त्यांचा मोठा भाऊ चंद्रकांत ठाकरे व पुतण्या यांच्यासमवेत मद्यप्राशन केले. यावेळी त्या तीघांमध्ये कीरकोळ कारणावरून शाब्दीक वादावादी झाली. त्यानंतर या रागातून शुक्रवारी दुपारी भाऊ चंद्रकांत आणि पुतण्या यांनी पुन्हा ठाकरे यांच्याशी वाद घातला. हा वाद विकोपाला गेल्याने दोघांनी ठाकरे यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत ठाकरे यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान या घटनी माहिती मिळताच नाटे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून घटनेचा पंचनामा करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणातील संशयित आरोपी यांचा विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम पोलिसांकडून सुरू होते. नाटे ठाकरेवाडी येथे घडलेल्या या घटनेने तालुक्यात एका खळबळ उडाली आहे.