
संशयिताचा मोबाईल करणार अनैतिक व्यापाराचा पर्दाफाश
नावे समोर येण्याच्या भीतीने अनेकांचे धाबे दणाणले
रत्नागिरी
नजीकच्या खेडशी येथे रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे यांच्या संयुक्त कारवाईने देहव्यापाराचा पर्दाफाश मंगळवारी रात्री करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणी देहव्यापार करणाऱ्या ४ महिलांना ताब्यात घेतले. तसेच हा अनैतिक व्यापार करणाऱ्या संशयिताला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे. या मोबाईलमध्ये अनेक कॉल डिटेल्स पोलिसांना आढळून आले आहेत. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले असल्याचे बोलले जात आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनैतिक व्यापार’ चालू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे त्वरित कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे तसेच रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे एक पथक तयार करण्यात आले. तसेच एक डमी गिऱ्हाईक पाठवून खेडशीतील एका लॉजवर छापा टाकण्यात आला. येथे देह विक्रीचा व्यवसाय करण्यासाठी ४ महिला आणल्या असल्याचे पोलिसांना आढळले. तसेच हा व्यवसाय चालवल्याप्रकरणी अरमान करीम खान (रा. कोकणनगर, रत्नागिरी) याला पोलिसांकडून अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ कायद्या अंतर्गत रत्नागिरी ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा अधिक तपास रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे करीत आहेत. ही कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी राजेंद्र यादव, सहाय्यक पोलीस फौजदार सुभाष भागणे, हवालदार नितीन डोमणे, शांताराम झोरे, बाळू पालकर, प्रवीण खांबे, गणेश सावंत, सत्यजित दरेकर, वैष्णवी यादव यांनी केली.