चिपळूणजवळ अनोळखी पुरुषाचे कुजलेले प्रेत आढळले
चिपळूण तालुक्यातील मौजे खांडोत्री ते वहाळकडे जाणाऱ्या पायवाटेवर चंडीभाई टेप येथील बरगळीच्या झाडीजवळ एका अनोळखी पुरुषाचे कुजलेले प्रेत आढळून आले. ही घटना दि. १४ मे, २०२५ रोजी सकाळी ८:४५ वाजेपूर्वी उघडकीस आली, मात्र वेळेची निश्चिती होऊ शकलेली नाही.
खांडोत्री गावाचे पोलीस पाटील हे त्याच दिवशी घटनास्थळावरून जात असताना त्यांना दुर्गंधी जाणवली. पाहणी केली असता त्यांना एका अंदाजे ६० वर्षीय अनोळखी पुरुषाचे कुजलेले प्रेत दिसले. त्यांनी तातडीने सावर्डे पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली.
सावर्डे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि पुढील तपासाला सुरुवात केली आहे. मृताची ओळख पटवण्याचे आणि त्याच्या मृत्यूचे कारण शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.