
गर्भवती मृत्यू प्रकरणात चालकावर कारवाई
आरोग्य विभागाचा अहवाल ; वेळेत रूग्णवाहिका उपलब्ध नसल्याने महिलेचा मृत्यू
मंडणगड: तालुक्यातील कुडुक बुद्रुक येथील त्या गरोदर मातेच्या मृत्यू प्रकरणाचा ठपका १०२ रुग्णवाहिकेवरील कंत्राटी वाहनचालकावर ठेवण्यात आला आहे. त्या वाहनचालकावर कारवाई करावी, असे आरोग्य विभागाकडून कळवण्यात आले आहे.
तालुक्यातील कुडुक बुद्रुक मंडणगड येथील विधी संदेश सावणेकर या गरोदर मातेचा १० मे रोजी मृत्यू झाला. ही बाब अत्यंत गंभीर असून, या प्रकरणाच्या चौकशीसाठी कोल्हापूर येथील आरोग्य विभागाच्या उपसंचालक स्तरावरील चौकशी पथक ११ रोजी मंडणगड येथे दाखल झाले होते. त्यांनी केलेल्या चौकशीमध्ये सर्व वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांचे जबाब नोंदवून घेतले आहेत.
या चौकशीमध्ये १०२ रुग्णवाहिकेवरील वाहनचालकाने मंडणगड ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध करून दिली नाही. त्यामुळे संबंधित गरोदर मातेला पुढील उपचारासाठी तत्काळ पाठवता आले नाही. वेळेत उपचारासाठी नेता न आल्याने त्या मातेचा मृत्यू झाला. त्या रुग्णवाहिकेवर ओम साई स्वयंरोजगार सेवा, सहकारी संस्थेमार्फत वाहनचालकाची नियुक्ती केलेली आहे. त्या संस्थेला संबंधित वाहनचालकांवर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ स्तरावरून देण्यात आले आहेत, असे मंडणगड तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयामार्फत एक पत्रकाद्वारे सांगण्यात आले.