
गर्भवती महिला मृत्यूप्रकरणी चौकशी पूर्ण
उच्चस्तरीय चौकशीत अधिकारी, कर्मचार्यांचे नोंदवले जबाब
मंडणगड
तालुक्यातील गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी आरोग्य सहाय्यक उपसंचालक, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा वैद्यकीय अधिकारी गेल्या २ दिवसांपासून तालुक्यात दाखल झाले आहेत. या संदर्भात उच्चस्तरीय चौकशी पूर्ण झाली असून या घटनेशी संबंधित सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे जाब नोंदवण्यात आले आहेत. या बाबत आरोग्य विभाग लवकरच अधिकृत माहिती देणार असून दोषींवर कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत.
या संदर्भात तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिषेक गावंडे यांनी मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, या विषयासंदर्भात वरिष्ठ स्तरावरील आरोग्य यंत्रणेने चौकशी करुन तयार केलेला अहवाल उपसंचालकांकडे सादर केला आहे. यामध्ये दोषींवर कारवाई होण्याचे स्पष्ट संकेतही देण्यात आले आहेत.
रुग्णवाहिका सुस्थितीत ?
तालुक्यात कार्यरत असलेल्या ३ प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका सुस्थितीत असून पूर्ण वेळ चालक उपलब्ध आहेत. तसेच इंधनाची व्यवस्था वेळोवेळी योग्य पद्धतीने करण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात विसंगती यामध्ये असल्याचा आरोप तालुकावासियांतून होत आहे.
चौकशी समितीत महाराष्ट्र राज्य सहाय्यक उपसंचालक डॉ. सूर्यवंशी, डॉ. मोहिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, उपजिल्हा शल्य चिकित्सक डॉ. ठोंबरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी सगरे, वैद्यकीय अधीक्षक कामथे डॉ. असिम कुमार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिषेक गावंडे यांचा समावेश असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
गरदोर माता मृत्यूप्रकरणी दोर्षीवर कारवाईचे आदेश
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिषेक गावंडे यांनी १३ मे रोजी सायकांळी ५.३० वाजता काढलेल्या प्रेसनोटच्या माध्यमातून जाहीर केले आहे. १० मे रोजी विधी सरवणकर या गरोदर मातेचा मृत्यू झाला. या गंभीर बाबीची चौकशी करण्यासाठी ११ मे रोजी उपसंचालक आरोग्य सेवा कोल्हापूर यांनी मंडणगड येथे चौकशी करुन वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले. या चौकशीत १०२ रुग्णवाहिकेच्या चालकांकडे रुग्णवाहिका असूनही त्यांनी ती ग्रामीण रुग्णालय मंडणगड येथे वेळेवर उपलब्ध करुन दिली नाही. त्यामुळे मातेला तत्काळ संदर्भीत करण्यात आले नसल्याचे मातेचा मृत्यू झाला. या वाहनचालकाची नियुक्ती ओम साई स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था मर्यादित रत्नागिरी या संस्थेमार्फत केली आहे. या संस्थेला वाहनचालकावर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ स्तरावरुन निर्गमित करण्यात आल्याचे प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.