
रेल्वेत प्रवाशाची रोकडसह लॅपटॉप चोरी
संगमेश्वर : गरीबरथ एक्स्प्रेस गाडीमधून प्रवास करणाऱ्या प्रवासाची बॅग चोरीला जाऊन रोख रकमेसह ३५ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. सदर घटनेची नोंद संगमेश्वर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. याबाबत संद्रा सिरियक (रा. मुंबई) यांनी संगमेश्वर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सिरियक यांचे गाव केरळ येथून सुटी संपवून शिक्षणाच्या ठिकाणी परत पनवेल येथे येण्यासाठी निघाले असता ८ मे रोजी रेल्वेस्टेशन येथून गरीबरथ एक्स्प्रेस गाडीमधून प्रवास करत असताना सदरची गाडी उडपी रेल्वेस्टेशन येथे आल्यानंतर त्यांना झोप लागली. त्यानंतर ९ मे रोजी सकाळी ७ वाजता सदरची गाडी संगमेश्वर रेल्वेस्थानक येथे आल्यानंतर त्यांना खिडकीजवळ ठेवलेली बॅग दिसून आली नाही. त्या बॅगेमध्ये काळ्या रंगाचा लॅपटॉप किंमत रुपये तीस हजार तसेच रोख रक्कम पाच हजार रुपये चोरीला गेल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत अज्ञाताविरुद्ध संगमेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमेश्वर रेल्वेस्थानकादरम्यान काही दिवसांपूर्वी विश्रांतीकक्षातून दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेली होती. त्या चोरट्याला संगमेश्वर पोलिसांनी पकडले होते.