कृषी प्रदर्शनात हातखंब्याच्या बागायतदाराची विक्रमी उलाढाल
रत्नागिरी
शहरातील कृषी तंत्रज्ञान विस्तार सप्ताह व कृषी विकास परिषद प्रदर्शनात हातखंबा येथील आंबा बागायतदार मनोज नाचणकर यानी विक्रमी आर्थिक उलाढाल केली आहे. प्रदर्शनात लावलेल्या दोन सेंद्रीय आंबा स्टॉलच्या माध्यमातून हापूसची विक्री करून एका दिवसाला अडीच ते पावणे तीन लाख असे तीन दिवसाला सुमारे ८ लाखाचे उत्पन्न मिळवले.
येथील आठवडाबाजार येथील प्रमोद महाजन क्रीडासंकुल मैदानावर हा कार्यक्रम पार पडला. त्यामध्ये अनेक फळ, झाडे, विविध शासकीय विभाग योजना, बचतगट उत्पादने आदी स्टॉल्स लावण्यात आलेले होते. त्यामध्ये हातखंबा येथील मनोज नाचणकर यांनी सेंद्रीय हापूस आंबा विक्रीचा स्टॉल्स लावला होता.
त्या स्टॉल्सच्या माध्यमातून साधारण दिवसाला १६० पेटी (१ ते ४ डझनच्या) आंबा विक्री झाल्याची माहिती नाचणकर यांनी दिली. दिडशे रुपयापासून ते अगदी चारशे रुपये डझन या प्रमाणे त्यांनी आंब्याची विक्री केली. त्यांच्या या स्टॉलला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत गेला.
या कृषी महोत्सवात आंबा बागायतदारांच्या सहभागाचे हापूस विक्रीचे फारसे स्टॉल्स नव्हते. तीन त्यामुळे भविष्यात दिवसात या कृषी परिषदेमध्ये कोकणातील आंब्याला जास्त महत्त्व देण्यात यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आंबा बागायतदार मुंबई, पुणे, अहमदाबादला आंबा विक्रीसाठी जातात. पण तिथेही समाधानकारक भाव मिळत नाही. या स्टॉलला चांगल्या प्रकारे विक्री झाल्याचे नाचणकर यांनी सांगितले