राजापुरात शिवीगाळ केल्याच्या कारणावरून मारहाण; परस्पर विरोधी तक्रारी चौघांवर गुन्हा
राजापूर : तालुक्यातील गोठणेदोनिवडे हातणकरवाडी येथे शिवीगाळ केल्याच्या कारणावरून मारहाण करत दुचाकीचेही नुकसान केल्याची घटना ५ मे २०२५ रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. याबाबतची फिर्यादी शिवाजी तुकाराम भोवड (२८, व्यवसाय हमाली, रा. शीळ, ता. राजापूर) यांनी पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार प्रदिप दत्ताराम गोठणकर (वय ३३, रा. गोठणेदोनिवडे हातणकरवाडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ते आणि त्यांचे मित्र निखिल बाईत व अभिजीत बाईत हे शाईन गाडीवरून राजापूरकडून शीळकडे जात होते. त्यावेळी तुकाराम भुवड यांनी आरोपी प्रदिप दत्ताराम गोठणकर याला राजू बाईत यास शिवीगाळ का केली, असे विचारले. यावर आरोपी प्रदिपने फिर्यादीला पुन्हा आईवरून शिवीगाळ केली आणि ‘तू पुढे ये, तुला दाखवतो’ अशी धमकी दिली. त्यानंतर फिर्यादी आरोपी प्रदिप गोठणकर याच्या घराजवळ गेले असता, आरोपीने फिर्यादीच्या पोटात लाथ मारली. तसेच, फिर्यादीसोबत असलेल्या निखिल बाईत (२७, रा. शीळ, नागरेकरवाडी) यांच्या डोक्यात गाडीच्या चावीने धारदार टोकाने मारून दुखापत केली. आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ केली आणि त्यांच्या ताब्यातील शाईन गाडीचे नुकसान केले, असे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे. या मारहाणीत निखिल बाईत जखमी झाले आहेत.
याप्रकरणी राजापूर पोलिसांनी आरोपी प्रदिप दत्ताराम गोठणकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तर दुसऱ्या बाजूने प्रदिप दत्ताराम गोठणकर (वय ३३, रा. गोठणेदोनिवडे हातणकरवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते घरी जात असताना आरोपी शिवाजी तुकाराम भोवड (वय २८, व्यवसाय हमाली, रा. शीळ, ता. राजापूर) आणि त्याच्या दोन अज्ञात साथीदारांनी त्यांच्या घरी येऊन त्यांच्या भावाला शिवीगाळ केली होती. याचा राग आरोपी शिवाजी भोवड याच्या मनात होता.
त्यानंतर आरोपी आणि त्याच्या दोन साथीदारांनी मिळून प्रदिप गोठणकर यांच्या डोक्यात टोकदार वस्तूने मारले. तसेच, फिर्यादीच्या वडिलांच्या अंगावर गाडी घालून त्यांना खाली पाडले, यात त्यांच्या उजव्या हाताला आणि पाठीला दुखापत झाली. फिर्यादीची आई भांडण सोडवण्यासाठी आली असता, तिलाही मारहाण करून दुखापत करण्यात आली, असे फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे.
याप्रकरणी राजापूर पोलिसांनी परस्पर विरोधी तक्रारीनुसार चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास राजापूर पोलीस करत आहेत