रत्नागिरीतील एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या नावे बनावट फेसबुक आणि व्हॉट्सॲपद्वारे फसवणूक;राजस्थानमधून आरोपींना अटक!
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या नावे बनावट फेसबुक खाते तयार करून तसेच बनावट व्हॉट्सॲपद्वारे संपर्क साधून एका फिर्यादीला स्वस्त फर्निचरचे आमिष दाखवून ३ लाख ३१ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोघा आरोपींना रत्नागिरी सायबर पोलिसांनी राजस्थानमधून अटक केली आहे.
फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सायबर पोलीस ठाणे, रत्नागिरी येथे भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८ (४), ३१९ (२) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (सी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याच्या तपासात, फसवणुकीच्या आर्थिक व्यवहारांबाबत बँकांकडून मिळालेली माहिती आणि तांत्रिक विश्लेषणानंतर आरोपी दिनेश कुमार मिना (रा. मांगीलाल, गाव भचुंडला, अचनेरा, डालोत, प्रतापगढ, राजस्थान) आणि राकेश कुमार मीना (रा. भचुंडला, अचनेरा, डालोत, प्रतापगढ, राजस्थान) यांचा सहभाग निष्पन्न झाला.
आरोपींचे कोणतेही मोबाईल लोकेशन उपलब्ध नसताना, रत्नागिरी पोलिसांनी राजस्थान येथे तपास पथक पाठवले. स्थानिक बातमीदारांच्या मदतीने या दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोघांनाही ०४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या गुन्ह्याचा तपास आणि आरोपींना अटक करण्याच्या कामगिरीत पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक स्मिता सुतार, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पुरळकर, पोलीस हवालदार रामचंद्र वडार, पोलीस हवालदार विनोद कदम आणि पोलीस शिपाई अजिंक्य ढमढेरे यांनी सहभाग घेतला.
रत्नागिरी पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, आर्मी / सीआरपीएफ इत्यादी ठिकाणी अधिकारी असल्याचे भासवून बदली झाल्याचे कारण सांगून जुने फर्निचर / वाहने कमी किमतीत विकण्याचा बहाणा करणाऱ्यांच्या आमिषाला बळी पडू नये.