
कुंभार्ली घाटात बसची ट्रकला धडक; बस चालक जखमी
चिपळूण : कोल्हापूरहून चिपळूणकडे जाणारी एसटी बस ( एमएच १३ सीयु ७३६६) ने कुंभार्ली घाटात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रक ( एमएच ५० ४०९६) ला मागून धडक दिली. हा अपघात ०३ मे रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघातात एसटी बसचा चालक जयसिंग भिमराव पाटील ( ५४) जखमी झाला आहे.
फिर्यादी सागर बचन देशमुख (वय ३६) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बस चालक जयसिंग पाटील याला कुंभार्ली घाटातील रस्त्याचे वळण आणि उतार माहीत असूनही त्याने निष्काळजीपणे आणि भरधाव वेगात बस चालवली. त्यामुळे त्याचे नियंत्रण सुटले आणि बसने रस्त्याच्या डाव्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकला मागून धडक दिली.
या अपघातात एसटीच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे, तर चालक जयसिंग पाटील यालाही मार लागला आहे. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात एसटी बस चालक जयसिंग भिमराव पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.