
चिपळूण येथे बसची दुचाकीला धडक; वृद्ध गंभीर जखमी
चिपळूण: मुंबई-गोवा महामार्गावर कळंबस्ते बौद्धवाडी येथे ०२ मे रोजी सायंकाळच्या सुमारास बसने दुचाकीला दिलेल्या धडकेत वृद्ध गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. बस चालकाविरोधात चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शरद शंकर कदम (६० वर्षे, व्यवसाय- आयुर्वेदिक औषधाची एजन्सी, रा. कळंबस्ते, बौद्धवाडी, ता. चिपळूण) हे ०२ मे रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दुचाकीवरून मुंबई-गोवा हायवेने घरी जात होते. त्याचवेळी समोरून येणाऱ्या (एम.एच.१४ / एल.एक्स./६९३० ) एसटी बसचा चालक जालंदर राजाराम कसबे (४९ वर्षे, राहणार महालक्ष्मी, ता. रत्नागिरी) याने रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात बस चालवली. त्यामुळे बसची दुचाकीला जोरदार धडक बसली.
या धडकेत दुचाकीस्वार शरद कदम हे रस्त्यावर पडल्याने गंभीर जखमी झाले. या घटनेची नोंद चिपळूण पोलीस ठाण्यात करण्यात आली. पोलिसांनी बस चालक जालंदर कसबे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. जखमी शरद कदम यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.