बहुमताच्या जोरावर सरकारकडून सरळसरळ धमक्या: आमदार जितेंद्र आव्हाड
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) कार्यकर्ता मेळावा
रत्नागिरी : बहुमताच्या जोरावर सरकारकडून सरळसरळ धमक्या देण्यात येत आहेत, असा गंभीर आरोप महायुती सरकारवर करुन याच्यावर बोलायचंही नाही, हा विचार प्रत्येकाने करायला पाहिजेत, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) चे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रत्नागिरी येथे आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
आमदार आव्हाड हे गेल्या दोन दिवसांपासून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यांच्या उपस्थितीत रत्नागिरी शहरातील स्वयंवर मंगल कार्यालयात कार्यकर्त्यांच्या मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सचीव बशीर मुर्तुझा, जिल्हाध्यक्ष बारक्या बने, चिपळूणचे प्रशांत यादव, माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर व अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समाजामध्ये अस्वस्थता पसरलेली आहे. त्याचा मी राजकीय फायदा घ्यायला येथे आलेलो नाही. पण कोणी राजकारण करत असेल तर त्याला विरोध जरुर करणार, असेही स्पष्ट केले.
रिफायनरी प्रकल्पामुळे मासेमारी धोक्यात
राजापूर तालुक्यात येणाऱ्या बारसू येथील रिफायनरी प्रकल्पामुळे साखरीनाटे परिसरातील मासेमारीवर मोठा परिणाम होणार आहे. हा प्रकल्प आल्यास येथील कोकणातील संपूर्ण मासेमारी व्यवसाय बंद होऊन मच्छिमार उध्वस्त होईल, अशी भिती आव्हाड यांनी यावेळी व्यक्त केली.