
प्रतीक्षा संपली, उद्या जाहीर होणार बारावीचा निकाल
मुंबई: उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२५ चा निकाल सोमवार दिनांक ५ मे रोजी जाहीर होणार आहे. मंडळातर्फेत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच १२ वीचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपद्धतीनुसार सोमवार दिनांक ५ मे रोजी जाहीर केला जाईल. दुपारी १ वाजल्यापासून हा निकाल पाहता येणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं (MSBSHSE) उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC/12th) निकालासाठी अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचनेनुसार, महाराष्ट्र बोर्ड बारावीचा सोमवारी दुपारी जाहीर केला जाईल. बोर्डाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर, विद्यार्थी अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in वर जाऊन गुणपत्रिकेची प्रत डाऊनलोड करून निकाल पाहू शकतील. दरम्यान, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च 2025 दरम्यान दहावी आणि बारावीची परीक्षा घेण्यात आली होती.
ऑनलाईन निकालानंतर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच १२ वीच्या परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची पडताळणी, उत्तर पत्रिकांच्या छायाप्रती, पूनर्मुल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळकाडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन किंवा स्वतः किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय करण्यात आली आहे. ६ मे ते २० मे या कालावधीत हे अर्ज करता येतील.
बारावीचा निकाल जाहीर झाल्यावर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. दरम्यान दरवर्षी निकालाच्या दिवशी वेबसाईटवर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक पाहायला मिळते. वेबसाईटवर होणाऱ्या ट्रॅफिकमुळे निकाल लवकर समजत नाही. यामुळे विद्यार्थी आणि पालक त्रस्त होतात. पण आता वेबसाइटवर वाढणाऱ्या ट्रॅफिकचा विचार करता, माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी वेबसाइटची क्षमता वाढवण्याचे आणि सायबर सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे यंदा विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यात फारशी अडचण जाणवणार नसल्याची चर्चा आहे.