फसवणूक प्रकरणी २४६ वाहने जप्त; गुन्ह्यात दापोलीतील दोघांचा समावेश
वाहने भाड्याने लावून मोबदला देण्याचे आमिष; आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई
दापोली
मिरा -भाईंदर येथे वाहने भाड्याने लावून त्यातून मोबदला देण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी सदरील गुन्ह्यात तपास करून २४६ वाहने जप्त करत मुख्य आरोपीला बेड्या ठोकत सदरील घोटाळा उघडकीस आणला आहे. तसेच आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई केली आहे.
आरोपीने नवीन गाड्या शोरुममध्ये बुक करुन सदरच्या गाड्या या मुंबई एअरपोर्ट आणि जेएनपीटी बंदर येथे भाड्याने लावून प्रत्येक गाडीचे ५५ ते ७५ हजार रुपये भाडे मिळेल आणि भाडयाचे रक्कमेतून कर्जाचा हप्ता वगळता उर्वरित रक्कम प्रत्येक गाडीमागे भाडे देतो, अशी स्किम सांगून बुकींगसाठी १०० रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लेखी करारनामा करुन रोख रक्कम तसेच बँक खात्यात ऑनलाईन पैसे स्विकारले होते. सुरूवातीस तक्रारदार आणि साक्षीदार यांना गाडीचे भाडे म्हणून रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करुन तक्रारदारांचा विश्वास संपादन करुन गाडीच्या बुकींगसाठी घेतलेली रक्कम आणि गाड्यांचा अपहार करुन आर्थिक फसवणूक केली होती.
तपासादरम्यान मुख्य आरोपी राजु राजीव जोशी या बनावट नावाने तक्रारदार व साक्षीदार यांना स्वतःची ओळख सांगीतली होती. परंतु, तपासादरम्यान त्याचे खरे नाव संदिप सुरेश कांदळकर (रा.गणेशवाडी, नवशी, पो.पिसई, ता. दापोली जि. रत्नागिरी) हे असून त्याला २४ एप्रिल रोजी अटक केली होती. तसेच त्याचा साथीदार सचिन सुनिल तेटगुरे (रा. दापोली, जि. रत्नागिरी) यास २३ एप्रिल रोजी अटक केली आहे. तसेच इतर ७ आरोपी यात असल्याचे निष्पन्न असून त्याच्याकडे गुन्ह्याचे अनुषंगाने तपास सुरु केला आहे.
मुख्य आरोपी संदिप कांदळकर याने सह आरोपी यांच्या संगनमताने अंदाजे १३७५ गुंतवणुकदारांची २० कोटी ६० लाख रुपयांची आर्थीक फसवणूक केली आहे. आरोपीने आजपर्यंत २५० मोटार वाहनांचा (पिकअप टॅम्पो व कार-चारचाकी वाहने) अपहार केल्याचे निष्पन्न झाले असून अद्याप साक्षीदार तक्रार करण्यास येत आहेत. अपहरीत वाहने आणि फसवणुकीचे रक्कमेत वाढ होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. आतापर्यंत गुन्हयातील अपहरीत वाहनांपैकी २४६ मोटार वाहने अंदाजे किंमत २५ कोटी रुपयांची हस्तगत केली असून गुन्हयाचा तपास सुरू आहे.