
आ. जितेंद्र आव्हाड आज रत्नागिरीत
रत्नागिरी: कोकणातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा आज रत्नागिरीत पार पडणार आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, फायरब्रँड आमदार, कोकणचे प्रभारी आ. जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत हा मेळावा स्वयंवर मंगल कार्यालय, बोर्डिंग रोड, जुनामाळ नाका येथे सकाळी ११ वाजता होणार आहे.
या दौऱ्याच्या अनुषंगाने ३ मे रोजी रात्री ९ वाजता आमदार जितेंद्र आव्हाड यांचे रत्नागिरीमध्ये आगमन होणार असून, या मेळाव्याचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव व रत्नागिरीचे लोकप्रिय नेते बशीरभाई मुर्तुजा यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे.
या भव्य मेळाव्यात जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच पक्षाचे निष्ठावंत हितचिंतक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. नौसीन अहमद काझी (जिल्हाध्यक्ष, युवक रत्नागिरी) यांनी युवकांसह सर्व स्तरातील कार्यकर्त्यांना मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने कोकणात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संघटन बळकट होणार असून, आगामी राजकीय घडामोडींना गती मिळणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.