
आंदोलनकर्ते श्रीकांत कांबळींची नदीत उडी
चिपळूण : अवैध वाळू उपशाविरोधात चिपळूणमध्ये उपोषणाला बसलेल्या श्रीकांत कांबळी यांनी नदीत उडी घेऊन स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. चिपळूण पोलिस आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी उपोषणकर्त्याचे प्राण वाचवले आहेत. त्यांच्यावर चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
राज्य सरकारने नवीन वाळू धोरण जाहीर केले; मात्र त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे तालुक्यातील नद्या व खाड्यांमधील वाळूगटांचा लिलाव जाहीर झालेला नाही. बांधकामासाठी वाळू आवश्यक असल्यामुळे काही व्यावसायिक चोरून वाळू उपसा करत आहेत. काही ठिकाणी सक्शनपंपाद्वारे वाळू उपसा केला जात आहे. त्या विरोधात श्रीकांत काबंळी यांनी तहसीलदार कार्यालयासमोर महाराष्ट्रदिनी उपोषण सुरू केले होते. रत्नागिरी जिल्ह्यात ७ मेपर्यंत मनाई आदेश असल्यामुळे कांबळी यांनी उपोषण करू नये तसेच अनधिकृत वाळू उपसा होत असलेल्या ठिकाणी कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन तहसीलदार प्रवीण लोकरे यांनी कांबळी यांना दिले. तरीही त्यांचे समाधान झाले नाही.
महसूल प्रशासनाने माझ्या उपोषणाची दखल घेतली नाही, असा कांबळी यांचा आरोप होता. संतप्त झालेल्या कांबळी यांनी नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.
त्यांना वेळीच बाहेर काढले. त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना कामथे येथील जिल्हा उपकेंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. चिपळूण पोलिस ठाण्यातील पोलिस अमंलदार विजय भालेकर यांनी या संदर्भात फिर्याद दिल्यानंतर कांबळी यांच्याविरोधात पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.