
प्रेमसंबंधाच्या संशयातून प्रौढावर सुरीने वार
रत्नागिरी
तालुक्यातील नरबें-गोवळकरवाडी येथे प्रेमसंबंधाच्या संशयातून प्रौढावर चाकूने वार करण्यात आले. ही घटना १ मे रोजी सकाळी ८ च्या सुमारास घडली. नारायण धर्मा धनावडे (५५, रा. नरबे गोवळकरवाडी रत्नागिरी) असे जखमीचे नाव आहे. त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी गुरुनाथ नारायण शितप (रा. नरबे, गोवळकरवाडी रत्नागिरी) याच्याविरुद्ध खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. गुरुनाथ शितप व नारायण धनावडे हे नरबे गोवळकरवाडी येथे वास्तव्य करतात. गुरुनाथला त्याच्या ओळखीतील महिलेशी नारायण याचे प्रेमसंबंध असल्याचा संशय आला होता. या कारणावरुन त्यांच्यात वारंवार वाद उफाळून येत होता. १ मे रोजी सकाळी ८ च्या सुमारास प्रेमसंबंधाच्या संशयातून दोघांमध्ये पुन्हा एकदा वाद झाला. याचा राग आल्याने गुरुनाथ याने धारदार सुरीने नारायण यांच्या बोटावर, उजव्या पायावर सपासप वार केले. तसेच डाव्या कुशीच्या बरगडीखाली सुरी खुपसून त्यांना गंभीर जखमी केले. सुरीच्या वारामुळे नारायण हा रक्ताने माखलेल्या अवस्थेत खाली पडला. यावेळी नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी नारायण यांनी खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुरुनाथ याच्याविरुद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुरुनाथ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.