भूसंपादनाला ९५ टक्के प्रकल्पग्रस्तांचा पाठिंबा
जामदा भूमीपुत्र प्रकल्पग्रस्त संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
राजापूर
तालुक्यातील जामदा मध्यम प्रकल्पसाठी भूसंपादनाचा विषय प्रगतीपथावर असून गावातील ९५ टक्के लोकांचा प्रकल्पाला विरोध नाही. मात्र ज्यांचे या प्रकल्पामध्ये काहीचं जात नाही, असे लोक प्रकल्पग्रस्तांना विविध आमिषे दाखवून त्यांच्याकडून कमिशन लाटण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर घरांच्या मोजणीला लवकरच सुरुवात होणार असून त्याला पाठिंबा असल्याबाबतचे निवेदन जामदा भूमीपुत्र प्रकल्पग्रस्त संघटनेने जिल्हाधिकारी प्रांताधिकाऱ्यांना दिले आहे.
कार्जिडा ग्रामपंचायत कार्यालय येथे २२ मार्च रोजी आमदार किरण सामंत, प्रशासन व अधिकारी यांच्या उपस्थितीत सभा होऊन घरे मोजणी करण्याचे ठरले. त्याप्रमाणे जलसंपदा विभागाने घरांची संख्या जास्त असल्याने मोजणीच्या कामात वेळ लागू शकतो, तो कमी व्हावा यासाठी वेगवेगळ्या टीम तयार करुन घरे मोजणीचा कार्यक्रम हाती घेतला पण जे लोक या प्रकल्पाने प्रभावित होत नाहीत ते वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना निवेदने देऊन, फोटोसेशन करून स्वतःला स्वतःला प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत. या लोकांनी गावाला वेठीस धरण्याचा प्रयत्न चालविलेला आहे.
जामदा प्रकल्पातील राणेवाडी गावची अधिसूचना प्रसिद्ध होऊन दीड महिना झाला असून आजही घरांची मोजणी सुरू न होण्याचे कारण गुलदस्त्यात आहे. कार्जिडा गावातील जवळपास ६० टक्के संमतीपत्रे कार्यकारी अभियंता चिपळूण यांच्याकडे प्रकल्पग्रस्तांनी स्वतःहून दिलेली आहेत. अजूनही प्रकल्पग्रस्त संमतीपत्र देत आहेत. घरांची मोजणी लवकरच सुरू होणार आहे. प्रशासन त्यासाठी सज्ज असून सरसकट सर्वांचीच घरे व इतर बांधकामे मोजली जाणार आहेत.
९० टक्के प्रकल्पग्रस्तांचा मोजणीला पाठिंबा
ग्रामपंचायत, सरपंच आणि ९० टक्के प्रकल्पग्रस्त यांचा घरांच्या मोजणीसाठी पाठिंबा आहे. मे व जून महिन्यांमध्ये घरांची मोजणी झाल्यास पावसाळ्यामधील तीन महिने प्रशासनातील लोकांना घरांचे मूल्यांकन करण्यासाठी वेळ मिळेल व भूसंपादनाचा विषय मार्गी लागेल असे दिसते. प्रकल्पग्रस्तांचा पाठिंबा असल्याने आता कितीही विरोध असला तरी घरांची मोजणी ही होणारच असा निर्धार जामदा भूमिपूत्र प्रकल्पग्रस्त संघटना व ग्रामस्थांनी केलेला आहे. तसे निवेदन जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी रत्नागिरी, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, कार्यकारी संचालक यांना देण्यात आले आहे.