
झाडावरून पडून जखमी झालेल्या प्रौढाचा मृत्यू
दापोली
आंबे काढताना पाय घसरून झाडावरून पडल्याने जखमी झालेले दापोली तालुक्यातील राजापूर येथील आंबा बागायतदार दिलीप गणेश करमरकर (६५) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
दिलीप करमरकर हे सध्या जालगाव येथील रहिवासी व वडापाव व्यावसायिक होते. ते आपल्या राजापूर येथील बागेतील आंबे काढत असताना मंगळवारी दुपारी झाडावरून पाय घसरून पडले. यानंतर त्यांना शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून त्यांना उपजिल्हा रुग्णालयात अधिक उपचारासाठी नेण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र उपजिल्हा रुग्णालयात अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
याबाबत पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, बहीण, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.